बंद करा

जिल्ह्याचे रूपरेखा

सहकारातून ग्रामोध्दार व संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा अहिल्यानगर  जिल्हा पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला आहे. क्षेञफळाच्या दृष्ट्टीने महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असलेल्या या जिल्हयाचे एकूण भौगोलिक क्षेञ १७०४८ चौ.कि.मी. असून ते राज्याच्या क्षेञफळाच्या ५.६ टक्के आहे.
या जिल्हयाच्या उत्तर सीमेवर नाजिक ईशान्येस औरंगाबाद पूर्वेस बीड व उस्मानाबाद हे जिल्हे असून दक्षिण सीमेवर सोलापूर, पश्चिम सीमेवर ठाणे व पुणे जिल्हे लागून आहेत. २०११ च्या जनगणनेप्रमाणे जिल्हयाची एकूण लोकसंख्या ४५४३१५९ आहे.
पश्चिमेकडील डोंगराळ भाग व पूर्वेकडील सखल भाग हे जिल्हयाचे स्वाभाविक विभाग आहेत. पश्चिम भागातील हवामान थंड व कोरडे तर पूर्व भागातील हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्हयातील सरासरी पर्जन्यमान ३८२ मि. मीटर इतके असून पर्जन्यमानाची वाटणी असमान आहे.
गोदावरी व भीमा या जिल्हयातील प्रमुख नद्या आहेत. अहिल्यानगर जिल्हयाच्या उत्तर सीमेवरुन गोदावरी नदी वाहते. प्रवरा व मुळा या तिच्या उपनद्या आहेत. भीमा नदी जिल्हयाच्या दक्षिण सीमेवरुन वाहते. दक्षिण भागातून सीना,हंगा, घोड या नद्या दक्षिणेकडे वाहतात. काळी लालसर, काळी बरड व पांढरी या प्रकारात जिल्हयाची जमीन विभागलेली आहे. जनगणना २०११ नुसार जिल्हयात १५८४ गांवे( तीन निर्जन गावांसह घानेगाव, सुजलपूर व गोंधवणी ) १४ तालुक्यात विखुरलेली आहेत. १४ पंचायत समित्या, १३११ ग्रामपंचायती, १ महानगरपालिका, ९ नगरपालिका,१ (शिर्डी ) नगर पंचायत व १ कटकमंडळ जिल्हयात आहेत.
रब्बी ज्वारी हे जिल्हयाचे मुख्य पिक, खरीप हंगामात बाजरी, भूईमूग, मठ, सोयाबीन व मूग ही पिके तर रब्बी हंगामात ज्वारी, गहु, हरभरा ही पिके घेतली जातात. ऊस हे जिल्हयाचे प्रमुख नगदी पिक असून त्यामुळे जिल्हयाची आर्थिक प्रगती झाली आहे. द्राक्षे, संञी, डाळींबेइ. फळांचे उत्पादनही जिल्हयात घेतले जाते. जिल्हयातील बागायत शेती प्रामुख्याने विहिरींच्या पाण्यावर केली जाते. गंगापुर, भंडारदरा, मुळा, घोड, कुकडी या धरणाच्या पाटपाण्यामुळे शेतजमिन ओलीताखाली येण्यास मदत झाली आहे.
सहकार क्षेत्रातील अग्रणी ही आपली ओळख अहिल्यानगर जिल्हा आजही जटकवून आहे. भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना सन १९५० मध्ये प्रवरानगर येथे उभारला गेला. जिल्हयात २०१५-१६ या वर्षाअखेर सर्व प्रकारच्या एकूण ५२९५ सहकारी संस्था आहेत.
उद्योग क्षेत्रात अहिल्यानगर जिल्हा प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्र राज्याच्या निम्म्याहून अधिक साखरेचे उत्पादनएकटया नगर जिल्हयात केले जाते. २०१६ अखेर जिल्हयात २० साखर कारखाने कार्यरत आहेत.
जिल्हयात मार्च २०१६ अखेर १०० टक्के विद्युतीकरण झालेलेअसून विद्युतीकरण झालेल्या खेडयांची व शहरांची संख्या १६०३ आहे.
अहिल्यानगर जिल्हयामध्येआरोग्य सेवे अंतर्गत सार्वजनिक व शासन सहाय्यित रुग्णालये, २० दवाखाने, ९६ प्राथमिक आरोग्यकेंद्रे व ५५५ उपकेंद्रे उपलब्ध आहेत.
अंगणवाडीपासून अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालया पर्यंत तसेच कृषि विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक सोयी अहिल्यानगर जिल्हयात उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातले पहिले कृषि विद्यापीठ राहुरी येथे स्थापन झाले असून कृषि अध्यापन व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहे. सप्टेंबर २०१६ अखेर ५०४६ प्राथमिक शाळा, ९५६ माध्यमिक शाळा व १०८५ उच्च माध्यमिक शाळा जिल्हयात आहेत.

मध्य रेल्वेचा १९७ कि.मी. लांबीचा मार्ग जिल्हयातून जातो. सर्व प्रकारच्या २२१८६.८७ कि.मी.लांबीच्या रस्त्यांनी जिल्हयातील १५८४ गांवे जोडली असून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे प्रवासी वाहतूकीचे विस्तृत जाळे या जिल्हयात आहे. एस. टी. मार्गाची एकूण लांबी ६०४७१ कि.मी.असून एस.टी. महामंडळाच्या ८४१ एस.टी. बसेस जिल्हयात रस्त्यावर धावतात.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही जिल्हयाची अग्रणी बॅक असून जिल्हयात एकूण ६१०  वर्गीकृत  बँकाची कार्यालये आहेत. आशिया खंडात सहकार क्षेञात प्रथम क्रमांकावर असलेल्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवती सहकारी बॅकेच्या व इतर सहकारी बॅकेच्या एकूण २९६ शाखा जिल्हयात मार्च २०१६ अखेर कार्यान्वित होत्या. अहिल्यानगर जिल्हयाची अन्नधान्याची बाजारपेठ महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

आदर्श ग्राम योजनेचा मानदंड स्थापित केलेले पारनेर तालुक्यातील राळेगणसिध्दी हे गांव आदर्श खेडे म्हणून प्रसिद्ध आहे. विविध राज्यातील प्रशासकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, शासकीय प्राधिकारी,सामाजिक कार्यकर्ते व विविध देशी-विदेशी संस्था/ संघटनांचे प्रतिनिधी येथील कामांची पाहणी करण्यासाठी व अभ्यासासाठी भेट देत असतात. जलसंधारण, स्वच्छ इंधन इ. द्वारे लोकसहभागातून शाश्वत विकासाचा मूलमंत्र नगर तालुक्यातील  हिवरेबाजार गावाने राज्यात घालून दिला आहे.

श्री साईबाबांची शिर्डी व अवतार मेहेरबाबांचे मेहराबाद ही अहिल्यानगर जिल्हयातील धार्मिक स्थळे ही भारतातील नव्हेतर जगातील अनेक भक्तांची श्रध्दा स्थाने आहेत. याशिवाय श्री ज्ञानेश्वर मंदिर (नेवासा), श्री शनी शिंगणापूर, श्री दत्त मंदिर (देवगड) व चौंडी ( पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मस्थान), हजारो भाविकांचे श्रद्धास्थान भगवानगड (पाथर्डी)  व  सिध्दी विनायकाचे  सिध्दटेक या तीर्थक्षेञांनी भाविकांच्या मनात अहिल्यानगर जिल्हयाचे आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे.